
गावी जाण्याचे तिकीट कन्फर्म करून देतो असे सांगून प्रवाशांना बाहेर नेऊन त्यांच्याकडील बॅग घेऊन पळ काढणाऱया टोळीच्या कुर्ला रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मोहम्मद मिरज मोहम्मद राईन आणि मोहम्मद नथुनी अख्तर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार मोहम्मद खान हे कुर्ला परिसरात राहतात. गेल्या महिन्यात त्याच्या भाऊ बैतुल्लाला गावी जायचे होते. तो लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आला. एक्स्प्रेस फलाटावर लागली की नाही हे पाहण्यासाठी बैतुला हे ब्रिजवरून खाली आले तेव्हा दोन जण त्याच्याकडे आले. कुठे जायचे अशी त्या दोघांनी बैतुल्लाला विचारणा केली. तेव्हा बैतुल्लाने आपल्याला उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी आपल्यालादेखील बस्तीला जायचे असल्याच्या भूलथापा मारल्या. एकत्र गावी जाऊया, त्याअगोदर तिकीट कन्फर्म करू असे सांगून बैतुल्लाला गोवंडी स्थानकात नेले. तेथे गेल्यावर आधार कार्डची झेरॉक्स घेऊन येण्यास बैतुल्लाला सांगितले.
झेरॉक्स आणण्यासाठी गेलेले बैतुल्ला हे परत आले तेव्हा ते दोघे तेथे नव्हते. फसवणूक झाल्याची माहिती बैतुल्लाने त्याच्या भावाला दिली. बैतुल्लाच्या भावाने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान गुरुवारी राईन आणि अख्तरला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी फसवणुकीची कबुली दिली.




























































