
प्रसिद्ध कीर्तनकार हभप इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हभप इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या व्हिडीओ बाबत खुलासा करताना त्या कीर्तनाचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्धच नसल्याचा खुलासा सायबर सेलच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या विषयावर पडदा पडणार जवळपास निश्चित झाले आहे, अशी प्रतिक्रिया PCPNDT समितीचे सचिव प्रदीप मुरंबिकार यांनी दिली आहे.
तसेच इंदुरीकर महाराजांना जिल्हा आरोग्य विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्याला इंदुरीकर महाराजांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले होते व आपण असे बोललोच नाही असेही स्पष्ट केले होते. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशा मागणीसाठी निवेदन दिले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवण्यात आली होती.
इंदुरीकर महाराजांच्या व्हिडीओवरून झालेल्या वादानंतर तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध करत अकोल्यातील नागरिकांनी दोन दिवसापूर्वी अकोला बंदची हाक देऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. सक्षम पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत इंदुरीकरांना दुसरी नोटीस नाही त्यामुळे तूर्तास तरी इंदुरीकर महाराजांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.


























































