
मुंबईतील गतकाळाचे वैभव असलेल्या ऐतिहासिक शिवडीच्या किल्ल्याची सुरक्षा, देखभाल, दुरुस्ती आणि सुशोभीकरण आता पालिका करणार आहे. हा किल्ल्ला राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे तो पालिकेकडे देखभालीसाठी सोपवावा यासाठी महापौर किशोरी पेडणेकर राज्य सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवणार आहेत. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक करण्याचे निर्देश महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईत 11 ऐतिहासिक किल्ले होते. त्यापैकी काहींची पडझड झाली आहे तर काही काळाच्या उदरात गडप झाले आहेत. शिवडीचा किल्ला हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, मात्र राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याकडे या किल्ल्याच्या देखभालीची तरतूद नसल्याने या किल्लाची दुरवस्था झाली आहे. ही बाब स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापौरांच्या निदर्शनाला आणून दिली. त्या पार्श्वभूमीवर शिवडी किल्ल्याच्या देखभालीसंदर्भात महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात महापौर किशोरी पेडणेकर, सचिन पडवळ आणि अधिकाऱयांची नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत महापौरांनी या किल्ल्याची जबाबदारी पालिका घ्यायला तयार असून राज्य सरकारच्या मंजुरीसाठी एक स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा. या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत शिवडी किल्ल्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) जयश्री भोज, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहआयुक्त (परिमंडळ–2) नरेंद्र बरडे तसेच एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, महापालिका पुरातन वास्तू जतन समितीचे संजय सावंत आदी उपस्थित होते.
– महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तू शास्त्र्ाविषयक अवशेष अधिनियम, 1960च्या अधिनियम–15व्या कलमातील तरतुदीवर आधारित ‘पुरातत्व विभागाची महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीमधून संगोपनार्थ किंवा पालकत्व स्वीकारण्याकरिता स्मारकाची निवड करता येईल व या स्मारकाच्या संगोपनार्थ 10 वर्षांकरिता स्मारकाचे पालकत्व घेता येईल, असा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयानुसार 10 वर्षांसाठी शिवडी किल्ल्याची जबाबदारी पालिका घेऊ शकते.



























































