
प्लॅस्टिकविरोधात पालिकेने 1 मार्चपासून जोरदार कारवाई सुरू केली असून दोन दिवसांत 4081 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असूत सुमारे चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत 1028.097 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून बाजार, दुकाने-आस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील 310 निरीक्षकांच्या ‘ब्ल्यू स्कॉड’च्या माध्यमातून मुंबईत कारवाई सुरू आहे. तरीदेखील मुंबईत अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांसारख्या प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार मे 2020 पर्यंत महाराष्ट्र ‘सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त’ पालिकेनेही मुंबईत जोरदार कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, 1 मार्चपासून सुरू करण्यात आलेली कारवाई आगामी काळात आणखी तीक्र करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
दादरचे फूल मार्केट आणि भाजी मार्केटमध्ये सोमवारी पालिकेने प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात कारवाई केली. यामध्ये 15 किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या. 315 फेरीवाले, 450 फुलविक्रेते आणि 76 दुकानांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 ठिकाणी कारवाई करून 45 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.
अशी झाली कारवाई
दुकाने व आस्थापना विभागाकडून 1325 ठिकाणी तपासणी करून 575.850 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये दोन दिवसांत एक लाखावर दंड वसूल करण्यात आला, तर परवाना विभागाकडून 2756 ठिकाणी तपासणी करून 452.247 किलो जप्त करण्यात आला. यामध्ये 2 लाख 75 हजारांवर दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरूनही दंड भरण्यास नकार देणाऱया एकाविरोधात आणखी तपास करून कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रतिबंधित प्लॅस्टिकमध्ये हँडल असलेल्या व नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, एकदाच वापरल्या जाणाऱया ताट, कप, प्लेटस्, ग्लास, चमचे, पाऊच, हॉटेलमध्ये अन्न-द्रवपदार्थ पॅकेजिंगसाठीच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
- प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळल्यास पहिल्या गुह्यासाठी पाच हजारांचा दंड वसूल केला जात आहे, तर दुसऱया गुह्यासाठी दहा हजार आणि तिसऱया गुह्यासाठी 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.




























































