तुर्भे ते खारघर भुयारी मार्गाचे काम जलदगतीने सुरू करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाणे-पनवेल वाहतूक, जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक यांची कोंडी सुटणार आहे. या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यासाठी लवकरात लवकर फिजिबिलिटी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तुर्भे ते खारघर या भुयारी मार्गाच्या कामाबाबत सदस्य गणेश नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुर्भे ते खारघर पायाभूत सुविधा समितीकडे पाठवून फॉरेस्ट व वाइल्ड लाइफची परवानगी आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी एमआयडीसी, एमएसआरडीसीने, सिडको यांनी 600 कोटी आणि उर्वरित 622 कोटी कर्जरूपाने उभे करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व सोयीने युक्त अहवाल जलदगतीने सादर करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.