
येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांच्यासह काही जणांवर दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी गुरुवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले.
अंबानी सकाळी 9.30 वाजता बेलॉर्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दाखला झाले. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. येस बँकेकडून घेतलेल्या कर्जप्रकरणी ईडी अंबानी यांची चौकशी करणार आहे. अंबानी यांच्या मालकीच्या समूहातील 9 कंपन्यांनी येस बँकेकडून 12 हजार 800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते परत केलेले नाही. याआधी ईडीने अंबानी यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र वैयक्तिक कारण देत त्यांनी हजर राहण्यातून सूट मागितली होती. मात्र ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठवून गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.































































