
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरती तसेच राज्यात लॉक डाऊन घोषित केल्यामुळे पेणच्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांनी पेणकरांची आर्थिक लूट करण्याचा सपाटा लावला आहे. नेहमी 10 रूपये किलोने मिळणारे टोमॅटो सोमवारी मात्र 40 ते 50 रुपये किलोने विक्री करण्यात येत होते. त्याचप्रमाणे 10 रूपये किलोच्या कोबीची किंमत 40 ते 50 रुपये घेण्यात येत होती. 20 रुपये किलो मिळणारा फ्लॉवर 50 ते 60 रुपये किलोने विकला जात होता. तसेच 10 रुपयाची कोथिंबीरची जुडी 20 रुपयाला विकण्यात येत होती. 20 रुपये किलोने मिळणारा भोपळा 40 रुपये किलोने विकला जात होता. नेहमी 25 रुपये किलोने मिळणाऱ्या कांद्याची ही 40 रुपये किलोने विक्री केली जात होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. रविवारी शहरांमध्ये भाजी मार्केटसह सर्व दुकान बंद होती. परंतु सोमवारी मात्र पेण शहरांमध्ये ठराविकच भाजीविक्रेते भाजी विकताना दिसत होते. भाजी विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने व लोकांमध्ये जनता कर्फ्यूची मुदत कधीही वाढू शकते अशीही भीती असल्याने पेण शहरातील अनेक नागरिक भाजी खरेदी करीता बाजारात गेले होते. यावेळी भाजी विक्रेत्यांकडून त्यांची अक्षरशः लूट होत होती.































































