परभणीत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, रब्बी पीकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील दोन-तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाली. विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागातील वीज गुल झाली होती. या पावसाच्या फटक्यामुळे फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पीकांचे आतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात हा पाऊस 27.6 मी.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद आहे.

परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये सोमवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास सोसाट्याच्यावारा पाठोपाठ मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने काहीकाळ जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे परभणी गंगाखेड, सोनपेठ या तालुक्यात रब्बी पीकांना मोठा फटका बसला आहे. मागील आठवड्यातच आवकाळी पावसासह गारपीट झाली होती. या पाठोपाठ पुन्हा एकदा गारपिटीने झोडपले आहे. बहुतांश भागातील गहू, ज्वारी ही पीके अक्षरश: आडवी झाली आहेत. दरम्यान, परभणीच्या हवामान खात्याने 30 आणि 31 मार्च रोजी मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. हा पाऊस 27.6 मि.मी. बरसली आहे. सोमवारी दुपारी परभणीचा पारा 37 अंशावर गेला असताना दोन ते तीन तासांमध्ये वातावरणात अचानक बदल झाला. या बदलाचे पर्यवसान अवकाळी पावसात झाले. सोसाट वाऱ्यासह हा पाऊस अर्धातास बरसला. रस्त्यांवरील खड्यात आणि सखल भागामध्ये पाणी साचले होते.

सोनपेठ आणि गंगाखेड या तालुक्यातही या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पीके आडवी झाली. त्याचबरोबर फळबागांनाही मोठा फटका बसला. तसेच रात्री 12 ते 2 या वेळेतही आवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. एकिकडे कोराना संसर्ग प्रादुर्भावाची टांगती तलवार असताना त्यात भरीस भर आवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांना आवकाळी पाऊस ही एक डोकेदुखी वाटू लागली आहे. या पावसात रब्बी पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्रभर वीज गुल झाल्यामुळे नागरिकांना रात्र जागुन काढावी लागली. सध्या घरी बसण्याची नागरिकांची शिक्षा चालू असतानाच रात्री जागरणाचीही शिक्षा भोगावी लागली. अनेक भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते.

शेतकऱ्यांच्या शेतमालाची शेत पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हाती आलेल्या पिकाचे व शेतमालाचे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. या धक्क्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शेतकरी पुढे अवकाळी अस्मानी संकट उभे आले आहे. सध उन्हाळ्याचे दिवस असले तरी या ऋतूमध्ये दिवसभरात उन्हाळा पहावयास मिळतो तर रात्रीच्या वेळी पावसाळा पहावयास मिळत आहे. अशा या वातावरणामध्ये या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेल्या ज्वारीचा कडबा व कणीस काळे पडले असून दाणे गळाले आहेत. तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील परीसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

गेल्या काही दिवसापासून कोरोना संसर्ग आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व जगभरात सर्व मानव जाती मोठ्या संकटात सापडली आहे. तसेच संपूर्ण देशभरात लॉक डाउन असल्यामुळे बाजारपेठा बंदच आहेत. त्यात भरीस भर आवकाळी पावसाची झाल्याने जिल्ह्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. नुकसान झालेल्या पीकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.