
कोरोनाचा तगडा मुकाबला करण्यात बीड जिल्ह्याला यश मिळाले आहे. चार सीमेवरील जिल्ह्यात कोरोना दाखल झाला असताना सुदैवाने अजून एकही रुग्ण सापडलेला नाही. असे असले तरी गुरुवारी रात्री उशिरा पाठवलेल्या स्वॅबच्या सॅम्पलचा अहवाल सायंकाळी सात वाजता समोर येईल त्या 18 जणांच्या अहवालकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्याच्या भोवती असणाऱ्या नगर, संभाजीनागर, जालना, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने जिल्हावासीयांना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. प्रशासनाने केलेल्या अजोड कामगिरीमुळे बीड जिल्ह्यात अद्याप तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. याचे श्रेय जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पॊदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना द्यावे लागेल. शहराची बाजू जशी डॉ. अशोक थोरात यांनी सक्षमपणे सांभाळली तसेच संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कामाला लावण्याचे काम डी एच ओ डॉ. राधाकिसन पवार यांनी केले.
वाड्या तांड्यापासुन गाव अन तालुका आरोग्य यंत्रणा कामाला लावली. बारीक बारीक दुर्लक्षित बाबींवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या दिवसरात्र परिश्रमाचे फलित जिल्ह्याला मिळत असताना गुरुवारी रात्री उशिरा जिल्ह्यात नव्याने 18 जणांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. यातील काही जण बाहेरच्या राज्यातून प्रवास करून बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यांचा अहवाल शुक्रवारी रात्री हातात पडेल. त्या अहवालाची संपूर्ण जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे. सध्या तरी या 18 जणांचे विलगीकरण केले आहे. त्यांच्यावर आरोग्य विभाग करडी नजर ठेवून आहे.



























































