चंद्रपूरात मजूरांसाठी 40 निवारा केंद्रे, मनोचिकित्सक करतायत मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकट हातावर पोट असलेल्या मजुरांना सर्वाधिक बसला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना मजुरांचे लोंढे एकाच जागी थोपविताना सर्वशक्ती पणाला लावावी लागली. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. मजूरवर्गाची संख्या अधिक असल्याने चंद्रपुरात 40 निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र घरी जायला मिळत नसल्याने सध्या इथे आश्रयाला असलेला मजूर अस्वस्थ आहे.

देश व राज्यातील कोरोना संकटात सर्वाधिक प्रभाव पडला आहे तो मजूर कामगार वर्गावर. मग तो बांधकाम मजूर असो औद्योगिक मजूर. या सर्व मजूरवर्गाला आहे तिथेच थांबण्याचे निर्देश केंद्र व राज्य सरकारांनी दिले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना संकट लोकसंपर्क टाळल्यामुळे थांबविता येतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देशोदेशीच्या सरकारांनी लॉकडाऊन जाहीर करत सर्व नागरिकांना घरीच राहा असा संदेश दिला. मात्र यात सर्वाधिक परवड झाली आहे ती मजूर आणि कामगार वर्गाची. चंद्रपूर जिल्हा उद्योग बहुल जिल्हा आहे. लगतच्या तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांमधून मोठ्या संख्येत परप्रांतीय मजूर या जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. सोबतच दक्षिणेत जाणारा महत्त्वाचा मार्ग हा या जिल्ह्यामधून जात असल्याने मजूर वर्गाला सोयीचा असलेला जिल्हा म्हणून याची ओळख आहे. लॉकडाऊन व उद्योगबंदी जाहीर झाल्याने हजारो मजुरांचे लोंढे आपल्या मूळ गावी जात असल्याचे चित्र देशाने अनुभवले. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने शून्य करोना मुक्त जिल्हा ध्येय साधण्यासाठी या सर्वच मजुरांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी जिल्हाभरात एकूण 40 निवारा केंद्रे स्थापण्यात आली. आजच्या घडीला या निवारा केंद्रांमध्ये 6 हजार कामगार आश्रयाला आहेत. सकाळ-संध्याकाळचे त्यांचे भोजन निवास व आरोग्य तपासणीची सुविधा या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या ठिकाणी वैद्यकीय व निवास-भोजनाची व्यवस्था असतानाही इथला कामगार घरी जाण्याच्या व कुटुंबियांना भेटण्याच्या ओढीने अस्वस्थ आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अशा सर्व निवारा केंद्रात आता मनोचिकित्सकांची सेवा देण्यात येत आहे. या केंद्रात वास्तव्याला असलेले कामगार हे मानसिकदृष्ट्या स्वस्थ रहावे व त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे हा यामागचा उद्देश आहे. कोरोना आजारामागे असलेले अनेक गैरसमज व गैरसमजुती या केंद्रांमध्ये तैनात केलेल्या मनोचिकित्सकांनी आपल्या प्रयत्नाने दूर सारले आहेत. कोरोना संकटाशी लढताना समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असणारा कामगारवर्ग देखील याला अपवाद नाही. म्हणूनच कोरोना दूर ठेवण्यासाठी या कामगारांचा पाठिंबा देखील महत्त्वाचा ठरत आहे, असे क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट दुर्गाप्रसाद बनकर यांनी सांगितले.

एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट पुढ्यात आहे. दुसरीकडे रोजी- मजुरी बुडत असल्याने ते अस्वस्थ आहेत. आगामी काळात या संकटामुळे नवे प्रश्न देखील निर्माण होणार आहेत. मंदी पुढ्यात येऊन ठेपली असताना सध्या कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी एकदिलाने एकत्र येण्याची गरज मात्र निर्माण झाली आहे. निवारा केंद्रातील कामगारांना मिळत असलेला मनोचिकित्सकीय पाठिंबा त्याचेच निदर्शक आहे.