हिंगोलीत कलेक्टर ॲक्शनमोडवर; रस्त्यावर उतरत 65 वाहनधारकांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली शहर व जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी योग्य नियोजन केले आहे. रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी दुचाकी, तीन चाकी, व चार चाकी वाहनांना फिरण्यास प्रतिबंध करणारा आदेश 5 एप्रिल रोजी काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही आज सहा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे स्वतः ॲक्शन मोडवर आले. रस्त्यावर उतरत जिल्हाधिकाऱ्यांनी 65 वाहनांवर कार्यवाही केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले निर्देश व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी आधी 31मार्च व त्यानंतर 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी व जमावबंदीचे आदेश हिंगोली शहरासह जिल्ह्यात लागू केले आहेत. तसेच नागरिकांना किराणा माल, भाजीपाला, फळे मिळण्यासाठी एक दिवस आड सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तर मेडिकल दुकाने दररोज सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र, वैद्यकीय कारण पुढे करून शेकडो नागरिक दुचाकी व चारचाकी घेऊन रस्त्यावर फिरताना दिसून आले. दिल्लीच्या तबलीकी मरकझहुन परत आलेल्या वसमतच्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या 20 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हिंगोलीमध्ये बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन नागरिकांकडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने फिरत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 5 एप्रिल रोजी हिंगोली शहरासह जिल्ह्यात दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहनांना रस्त्यावर प्रवेश बंद करण्याचा आदेश काढला आहे. या आदेशातुन वैद्यकीय आपातकाल तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी आणि जीवनावश्यक वस्तूची वाहने वगळण्यात आली आहेत. हे आदेश काढून देखील आज 6 एप्रिल रोजी मोठ्या संख्येने वाहने हिंगोली शहरात दिसून आली. त्यामुळे जिल्हाधिकारी जयवंशी हे स्वतः ॲक्शन मोडवर आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थांबुन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी स्वतः वाहनांची तपासणी करून वाहन धारकांना बाहेर पडण्याचे कारण विचारले. या दरम्यान तब्बल 65 वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यापुढे विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन येणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यावर देखील अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून जुजबी कारवाई केली जात असल्याने हिंगोलीत वाहन घेऊन फिरण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी कारवाईचा बडगा उगारल्याने यापुढे या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे.