‘व्हिक्टोरिया गोदाम आगी’तील शहिदांना अग्निशमन दलाचा सलाम, दुर्घटनेला 76 वर्षे पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील व्हिक्टोरिया बंदरात 1944 मध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या 66 अधिकारी- जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागली होती. या दुर्घटनेमुळे मुंबई अग्निशमन दलाच्या शौर्याची जगाला ओळख झाली. या दुर्घटनेला आज 76 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनेतील शहीद जवान-अधिकाऱ्यांना अग्निशमन दलाने भायखळा येथील मुख्यालयात श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला होता अशी माहिती अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली. व्हिक्टोरिया आग दुर्घटनेतील शौर्याला सलाम करण्यासाठी हा दिवस अग्निशमन सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

 मुंबई बंदरात 14 एप्रिल 1944 रोजी व्हिक्टोरिया गोदीमधील एक नंबर धक्क्याजवळच्या दारुगोळ्याने अचानक पेट घेतला होता. या आगीनंतर त्याठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असतानाच झालेल्या प्रचंड स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलातील 66 अधिकारी व जवानांना हौतात्म्य आले. आज याच बहादुर जवानांमुळे मुंबई अग्निशमन दलाचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. या दुर्घटनेची गांभिर्याने दखल घेत सरकारने 1968 साली 14 एप्रिल हा दिवस याच जवानांच्या स्मृती पित्यर्थ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतरही मुंबईत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना काही अधिकारी व जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या सगळ्या जिगरबाज जवानांच्या कार्याला सलाम करण्यासाठी भायखळा मुख्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते.