बोरीबंदर ते ठाणे आशियातील पहिल्या प्रवासी रेल्वेला 167 वर्षे पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वार शनिवार, वेळ दुपारी 3.35 वाजता, (मुंबई) ते ठाणे अशी आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली. या घटनेला उद्या गुरुवारी उणीपुरी 167 वर्षे पुर्ण होत असून भारतीय रेल्वे सेवा 168 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. कोरोना जागतिक साथीच्या टाळेबंदीने देशाची ‘प्रवासी रेलसेवा’ ठप्प असल्याने मध्य रेल्वे ट्वीटरवरच फोटो आणि आठवणी जागवून हा दिन साजरा करणार आहे. तर ठाणे स्थानकात काही रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य सोशल डिस्टन्सिंग पाळून एकत्र जमणार आहेत.

त्याकाळी साहीब, सिंध आणि सुल्तान या तीन वाफेच्या इंजिनाच्या मदतीने 14 डब्यांची रेल्वे धावली होती. या गाडीत त्यावेळी 400 प्रवाशांनी प्रवास केला होता. त्याकाळी लोकल ही संकल्पना नव्हती. नंतरच्या काळात लोकल हा शब्द रुढ झाला. तेव्हा बोरीबंदर ते ठाणे हे 33.8 किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी 57 मिनिटे लागली. विशेष म्हणजे आजही लोकलला सीएस‌एमटी ते ठाणे हे अंतर पार करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो आणि या दुपारी 3.35 वाजताची लोकल आजच्या वेळापत्रकात समाविष्ट आहे.

देशातील पहिला रेल्वे पुल
सोशल नेटवर्क एका खाडी पुलावरून वाफेच्या इंजिनाच्या मदतीने धावणारी ट्रेन दाखवून हिच पहिली हिंदुस्थानी ट्रेन म्हणून छायाचित्र प्रसिद्ध केले जाते ते चुकीचे असून ते पुण्याजवळील दापोडी (हॅरिस) पुलाचे आहे. त्यात एकच इंजिन दिसत आहे. त्याकाळी साहीब, सिंध आणि सुल्तान या तीन वाफेच्या इंजिनाच्या मदतीने 14 डब्यांची रेल्वे धावली होती. हे दृश्य ठाणे खाडी पुलासारखे दिसल्याने खपवले जात असावे असे रेल्वे अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ट्वीटरवर म्हटले आहे. खरे चित्र उपलब्ध नसल्यामुळे हे चित्र वापरले जाते. ठाणे खाडीवर बांधलेला रेल्वे पुल देशातील पहिला रेल्वे पुल आहे.