
जेईई (मेन) परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकाबाबत सोशल मिडियात बनावट नोटीस व्हायरल करणाऱया उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) कारवाईचा इशारा दिला आहे. जेईई (मेन) परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात होणार नसून यासंदर्भातील सोशल मिडियातील नोटीस बनावट आहे. उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केल्याबद्दल संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे एनटीएने एका परिपत्रकात म्हटले आहे.
जेईई(मेन) परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकाबाबत दिशाभूल करणारी जाहीर नोटीस 14 एप्रिलला सोशल मिडियात व्हायरल केली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही बाब निदर्शनास येताच एनटीएने कठोर भूमिका घेत संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. उमेदवारांनी त्या नोटीशीवर विश्वास ठेवू नये. जेईई(मेन) परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात घेण्याचे नियोजन नाही, एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरील उपलब्ध माहितीच उमेदवारांनी ग्राह्य धरावी, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.





























































