बाप रे! 60 डिग्री तापमानातही जगू शकतो कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान सतत वाढत आहे. आता कोरोनाचे काही खरे नाही. कोरोना विषाणू उष्णतेने मरून जाणार. असा विचार करत असाल तर सावधान! हा विषाणू इतका जिद्दी आहे की 60 डिग्री सेल्सियस तापमानातही तो जगू शकतो आणि पसरू शकतो.

दक्षिण प्रान्समधील एड्क्स मार्सियेले विद्यापीठातील प्राध्यापक रेमी शेरेल आणि त्यांच्या सहकाऱयांनी कोरोना विषाणूला 60 डिग्री सेल्सियस तापमानात एक तास ठेवून संशोधन केले. इतक्या तापमानातही या विषाणूची संसर्ग पसरवण्याची क्षमता कायम होती. त्यामुळे तापमान वाढल्यावर कोरोना निक्रीय होईल हा केवळ गैरसमज ठरला आहे. हिंदुस्थानात तापमान काही ठराविक राज्यांमध्येच कमाल 50 डिग्री सेल्सियसपर्यंतच पोहोचते अशी आतापर्यंतची आकडेवारी सांगते.

असे केले संशोधन…
जर्मनीतील कोरोना रुग्णाच्या शरीरातून विषाणू घेतले गेले. आफ्रिकेतील एका विशिष्ट जातीच्या माकडांच्या किडनीमधील पेशींमध्ये ते सोडले गेले. ते विषाणू स्वच्छ आणि खराब अशा वेगवेगळ्या वातावरणात ठेवले गेले. एका नळीत स्वच्छ वातावरणातील विषाणू तर दुसऱया नळीत खराब वातावरणातील विषाणू घेतले गेले. त्यांना उच्च डिग्री तापमानात ठेवले गेले. स्वच्छ वातावरणातून घेतलेला कोरोना विषाणू निक्रिय झाला.

कोरोना संपवायला हवे 92 डिग्री तापमान
कोरोना विषाणूला वेगवेगळय़ा तापमानात ठेवले गेले. त्यात असे दिसून आले की हा विषाणू 92 डिग्री तापमानात किमान 15 मिनिटे ठेवल्यानंतर मरतो.