
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महा पालिकापरिचारिका पदासाठी मोठय़ा प्रमाणात परिचारिका पदाची भरती करत आहे. या भरती प्रक्रियेची यादी आज जाहीर झाल्यामुळे शेकडो महिला आणि त्यांच्या नातेवाईकांनी परळच्या एफ/दक्षिण वॉर्डमध्ये गर्दी केल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने पालिका रुग्णालये तसेच कोरोना सेन्टरमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, शिपाई पदासाठी कंत्राटी पध्द्तीने तात्काळ भरती सुरू केली आहे. परळमधील वॉर्ड कार्यालयात आज 850 परिचारिका पदासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी लावण्यात आली. मात्र, यात अनेकांची नावे नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच पालिका प्रशासनाकडून वेळीच काही माहिती मिळत नसल्यामुळे त्यात भर पडली.
उमेदवारांची नावे यादीत नसणे, ही तांत्रिक चूक असू शकते. अशी चूक असल्यास ती दुरुस्ती करता येऊ शकते. त्यासाठी काही दिवस लागू शकतात.- अमेय घोले, अध्यक्ष, आरोग्य समिती






























































