अर्थव्यवस्थेची बदलणारी परिमाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विनायक कुलकर्णी

कोरोनामुळे हिंदुस्थानसह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला जवळजवळ ठप्प केले आहे. हिंदुस्थानातही त्याचा मोठा आर्थिक तडाखा बसला आहे. उत्पादन क्षेत्रापूjleer असलेली मंदी कोरोनामुळे सेवा क्षेत्रातही पसरली आहे. उत्पादन थांबले तशी मागणी आणि पुरवठाही मंदावला आहे. स्थलांतरित मजुरांपासून पूर्णवेळ काम करणाऱया कर्मचाऱयांनाही या परिस्थितीत दणका बसला आहे. जागतिक आणि हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची परिमाणे कोरोनामुळे मोठय़ा प्रमाणात बदलत आहेत. त्यामुळे सरकारबरोबरच जनतेनेसुद्धा अधिक सजग राहणे सगळय़ांच्या हिताचे ठरणार आहे.

कोरोना विषाणूने (कोविड-19) आज संपूर्ण जगाला ओलीस धरले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 193 देशांत कोरोनाने अस्तित्व दाखवून हाहाकार माजवला आहे. आज या कोविड -19 विषाणूंनी जगभरातील दहा लाख लोकांना आपला तडाखा दिला आहे. 2019 मध्ये आधीच जागतिक अर्थव्यवस्था दोलायमान होती. त्यात कोरोनाने जगभरातील आर्थिक व्यवहार ठप्प केले आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांची उत्पादने निर्मितीची प्रक्रिया स्थगित केली आहे. चीनमधील मंदीचा हा परिणाम जगभरात दिसून येत आहे. जगाचा खरेदी व्यवस्थापनाचा निर्देशांक 50 च्या खाली घसरल्यामुळे मंदीची स्पष्टता दिसून येत आहे.

जागतिक रेस्टॉरंट निर्देशांक मार्च 2018 च्या तुलनेत गतवर्षी 89 टक्क्यांनी घसरला आहे. तो आता 100 टकक्यांनी खाली जावून काही आठवडे तरी तसाच राहणार आहे. याचाच अर्थ असंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस्ना एकतर बंद करावी लागतील किंवा त्यातील कर्मचाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी करावी लागतील. काहींना अगदी कमी नफ्याच्या स्तरावर कार्यरत राहावे लागेल. अमेरिकेतील 14 मार्चची माहिती अशी आहे की, दर आठवडय़ाला बेरोजगार होण्याचे प्रमाण 33 टक्के आहे. सुरक्षित चलन म्हणून यूएस डॉलर, येन आणि युरो यांच्याकडे सर्व देशांनी धाव घेतल्याने इतर चलने दुर्बल झाल्यासारखी वाटत आहेत. देशाबाहेरील कंपन्यांनी आणि उद्योगांनी दिलेल्या तीन ट्रीलियन डॉलर्सची कर्जे आज अमेरिकेच्या डोक्यावर आहेत. वस्तू-जिन्नस निर्यातदार की ज्यांनी डॉलर्समध्ये अर्थसहाय्य घेतले आहे ते वस्तू-जिन्नस पुरवठा घसरण्याची जोखीम असल्याने अडचणीत येत आहेत. लोकांची मागणी कमी झाल्याने उद्योगातील गुंतवणुकीस अनेकांनी हात आखडते घेतले आहेत. अमेरिकेसारख्या अतिप्रगत मानल्या गेलेल्या देशातसुद्धा अनिश्चितता वाढीस लागत असल्याने जनता सावध पवित्र घेत आहेत.

कोविड-19 चा विकसनशील देशांना फटका बसत असल्याचे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट [UNCTAD] च्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की चीन आणि हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर इतर प्रगत राष्ट्रांपेक्षा कमी परिणाम अपेक्षित आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न ‘जीडीपी’ दरात किमान तीन ते चार टक्के घसरण अपेक्षित आहे.

तसे म्हटले तर इटली, इंग्लंड आणि अमेरिकेइतकी आरोग्य आणीबाणी संपूर्ण हिंदुस्थानात नसली तरीही महाराष्ट्रासारखे अग्रणी राज्य या साथीच्या रोगामुळे ग्रस्त आणि त्रस्त झाले आहे. एकीकडे ही एक प्रकारची आर्थिक आणीबाणी समजूनच केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून अन्नाची आणि आर्थिक मदत करण्याची मोठी भूमिका घेतली पाहिजे तर दुसरीकडे जागतिक समन्वय साधून रोगाच्या नियंत्रणासाठी धोरणे त्वरेने अंमलात आणली गेली पाहिजेत. काही व्यवसाय उद्योगांसाठी विशिष्ट स्थलानुरूप अपेक्षित आहेत. डिजिटल व्यवहारांना आणि व्यवसायांना अधिक महत्त्व प्राप्त होऊन या व्यवहारांत सुलभता येईल. कमीतकमी उत्पादन खर्चात निर्मिती करण्याचे धोरण उद्योजक आणि व्यावसायिक राबवण्याचा प्रयत्न करतील. सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग-व्यवसायांसाठी पुन्हा एकदा रोकड रकमेला हुकमी एक्क्याचे महत्त्व प्राप्त होईल. मागणी-पुरवठा साखळीत नेमकेपणे लवचिकपणा आणावा लागेल. सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायात कालापव्यय न करता चपळाईने कार्यरत व्हावे लागेल.

हे सर्व घडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची धोरणेसुद्धा समयोचित आणि परिणामकारी असली पाहिजेत. देशाची बिघडलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी सामान्य जनतेत अंतिम टोकावर असलेला गरीब, मजूर आणि रोजंदारीवरील कामगार यांच्यावर प्रथम लक्ष केंद्रित केले तरच त्यांची उपलब्धता उद्योग-व्यवसायांना होऊन उद्योगचक्र फिरणार आहे. रस्ते बांधकाम, नदी जोड प्रकल्प, जल वाहतूक, पायाभूत सोयीसुविधा देणारे प्रकल्प यांची कामे केली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. तसेच एकूण 39 आरोग्यासुरक्षांसाठी उपयुक्त ठरणाऱया वस्तूंचे उत्पादन वेगाने सुरू केले जात असून चीनमधून औषधांच्या कच्च्या मालाची आयात पूर्णतः थांबवून तोच माल हिंदुस्थानात लवकरात लवकर उत्पादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनांसाठी चार विशेष वैद्यकीय उपकरणे निर्मिती ‘पार्क्स’ सुरू करण्यात येत आहेत. पेट्रोल आणि तेलबियांची आयात कमी करण्यासाठी ग्रामीण उद्योगांतर्फे बायोडिझेल /इथेनॉल आणि तेलबियांच्या विक्रमी उत्पादनाची उद्दिष्टे निश्चित केली आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. ही जरी चांगली बाब असली तरीही याची फळे मिळण्यास किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

स्थलांतरित मजुरांना भोगाव्या लागलेल्या त्रासामुळे त्यांचे मन वळवावे लागेल. टाळेबंदीच्या कालावधीत किंवा त्यानिमित्ताने झालेली नोकरकपात लक्षात घेऊन त्या रिकाम्या हातांना काम मिळालेच पाहिजे. ज्यांची वेतन कपात झाली आहे किंवा नोकरी गेली आहे अशांच्या गृहकर्जाच्या हफ्त्यांबाबत सर्वसमावेशक धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी होईल तेसुद्धा बघितले पाहिजे. ज्या छोटय़ा लघु आणि मध्यम उद्योजकांना पुन्हा उद्योग उभारणीसाठी किंवा खेळत्या भांडवलासाठी दहा टक्के अधिक अर्थसहाय्य त्वरित देण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. तथापि ते कमी व्याज दराने कसे करता येईल याबाबत तातडीने निर्णय घेऊन बँका आणि वित्तीय संस्थांना केंद्र सरकारने तशा स्पष्ट सूचना द्यायला हव्यात. त्यासाठी गरज भासत असेल तर वेगळी मार्गदर्शक तत्त्वेदेखिल त्वरित घोषीत करावीत.

कोरोनामुळे जागतिक आणि हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची परिमाणे मोठय़ा प्रमाणात बदलत आहेत. नजिकच्या भविष्यात आणखीही काही बदल होऊ शकतात. त्यामुळे सरकारबरोबरच जनतेनेसुद्धा अधिक सजग राहणे सगळय़ांच्या हिताचे ठरणार आहे.

अस्तित्वाचा प्रश्न
कोरोनामुळे एकीकडे उत्पादनांच्या पुरवठा साखळय़ा जशा विस्कळीत केल्या आहेत तशीच लोकांची जिन्नस आणि वस्तूंची मागणी घटली आहे. आतापर्यंत मंदी फक्त उत्पननिर्मिती क्षेत्रापुरती मर्यादित होती, ती आता मागणी नसल्याने सेवा क्षेत्रातसुद्धा पसरली आहे. यामुळे मार्च–एप्रिलमध्ये खरेदी व्यवस्थापनाचा निर्देशांक या दोन्ही क्षेत्रांत घसरल्याचे स्पष्ट होणार असल्याने अर्थव्यवस्थेवरील ताण आणि तणाव वाढलेला असेल. कोविड-19 च्या प्रतिकारासाठी अंमलात आणलेले सामाजिक दूरत्व (सोशल डिस्टन्सिंग) एकीकडे विषाणूच्या प्रसाराला आळा घालत असतानाच दुसरीकडे सर्वच उद्योग आणि क्षेत्रांपुढे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा करीत आहे.

(लेखक गुंतवणूक समुपदेशक आहेत)
– [email protected]