
नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी सायंकाळी तीन वर पोहोचली असून सेलू येथून आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसेकर यांनी याला दुजोरा दिला आहे. नांदेड येथे यापूर्वी पीर बुरहाननगर येथे तसेच अबचल नगर येथे कोरोना संसर्ग असलेला रुग्ण आढळून आला होता. त्यापैकी पीर बुरहाननगरमधील रुग्णाचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला होता. सध्या हा रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दुसरा रुग्ण अबचलनगर येथे आढळून आला. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. सेलू येथील एक महिला मंगळवारी उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचे अहवाल मिळाले असून ते पॉझीटिव्ह आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आता कोरोनाचे तीन रुग्ण झाले आहेत. बुधवारी आणखी 99 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
































































