
तब्बल सव्वा महिन्यांनी चंद्रपूर शहरात कोरोनाबाधीत रुग्ण सापडलाय. शनिवारी रात्री साडे आठ वाजता त्याचा रिपोर्ट आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत यंत्रणेची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज पोलिसांनी रुग्ण असलेला कृष्ण नगरचा संपूर्ण परिसर सील केला. अंतर्गत रस्तेही रोखण्यात आले. वैद्यकीय कामाव्यतिरिक्त कुणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही. या भागात जंतुनाशक फवारणी केली जात असून घरोघरी जाऊन नागरिकांची विचारणा करण्यासाठी पथकेही कार्यरत करण्यात आली. हा संपूर्ण भाग झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो. अशा भागात लॉक डाऊननंतर सव्वा महिन्यांनी कोरोनाचा रुग्ण सापडणं, हे चकित करणारं आहे. ही व्यक्ती चौकीदारीचं काम करतो. त्यामुळं प्रशासनानं संबंधित बंगल्यातील लोकांना आणि रुग्ण ज्यांच्या थेट संपर्कात आला, अशा दहा लोकांना क्वारंटीन करण्यात आलं, यात चार जण त्याचे कुटुंबीय आहेत. या रुग्णाला न्युमोनिया झाला होता. एक मे रोजी त्याच्या उपचारासाठी तो कोविड हॉस्पिटलमध्ये गेला असता त्याच्या स्त्राव आणि रक्ताचे नमुने घेतले गेले. ते पोजीटिव्ह आले.































































