जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष परिश्रम घेतले जात असताना भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास हे कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत देखील कार्यालयात तसेच मुख्यालयी नियमबाह्य गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी आज 5 मे मंगळवारी त्यांच्या विरुध्द तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. नायब तहसिलदार पोलास हे 24 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत केवळ एक दिवस कार्यालयात हजर राहिले असून नियमबाहय गैरहजर राहणे, मुख्यालयी वास्तव्यास न राहणे,वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे आदी ठपका ठेऊन पोलास यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
































































