
पालिकेच्या जी-साऊथ म्हणजेच वरळी, लोअर परळ परिसरात कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे 305 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर शेकडो रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. देशात कोरोना रुग्ण डबल होण्याचे प्रमाण सुमारे 12 दिवस असताना वरळीत मात्र हा ‘डबलिंग रेट’ 16 दिवसांवर असल्याची माहितीही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
वरळीत रुग्णवाढीचे प्रमाण जास्त दिसत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. वरळीत रिकव्हरी रेट 35 टक्के असल्याची माहितीही महापौरांनी दिली. वरळीत आतापर्यंत 871 रुग्ण सापडले. मात्र यातील ३०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून शेकडो रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत असल्याचेही त्या म्हणाल्या. वरळी ‘एनएससीआय’ येथे 500 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी 383 जण दाखल आहेत. या ठिकाणी कोविड केअर सेंटर – 2 असल्याची माहितीही त्यांनी दिली. या ठिकाणी उपचार घेऊन तब्बल 92 रुग्ण घरी परत गेल्याचेही त्यांनी सांगितले. विभागात कुठेही रुग्ण आढळल्यास काँटॅक्ट ट्रेसिंग करून क्वारेंटाइन करणे, प्रभावी औषधोपचार, संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण अशा कामांमुळेच हे यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. वरळी, लोअर परळ परिसरात पालिकेच्या माध्यमातून केलेल्या उपायोजनांमुळेच ‘वरळी पॅटर्न’ देशात आदर्श ठरत असल्याचेही महापौर म्हणाल्या.
बीडीडी चाळ कडक लॉकडाऊन करणार
जी-साऊथ विभागात आतापर्यंत 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण विभागातील रहिवाशांनी अत्यंत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मात्र बीडीडी चाळसारख्या अनेक ठिकाणी गर्दी करण्याचे प्रकारही सुरूच असतात. त्यामुळे बीडीडी चाळीत आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्यासाठी वॉर्ड ऑफिसरकडून पोलिसांना पत्र देण्यात आल्याची माहितीही महापौरांनी दिली. लोकांनी खबरदारी घ्यावी, गर्दी टाळावी यासाठी संपूर्ण विभागात जनजागृती करण्यासाठी विशेष गाड्यांमधून काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतलेच पाहिजे, अन्यथा आपल्याला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेत असा इशाराही त्यांनी दिला.




























































