
लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरीत नागरिकांना परवानगी असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे. सकाळी 07 ते सायंकाळी 07 या कालावधीत केवळ अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे परवानगी असेल तरी नागरिकांना संध्याकाळी सातच्या आत घरात परतावे लागणार आहे.
सर्वांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी मास्क वापरणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे बंधरकारक आहे. नागरिकांनी सहकार्य करुन दंडात्मक कारवाईची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान इतर जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येण्याची इच्छा असणाऱ्यांनी केलेले अर्ज प्रशासनाला मिळाले आहेत. यानुसार जिल्ह्यात येण्याची विंनती करणारे 28,416 अर्ज आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून आपापल्या गावी जाण्यासाठीही नागरिकांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. या अर्जांची संख्या 26,158 इतकी आहे. परवानगी मिळालेल्या नागरिकांना त्यांच्यागावी जाण्यासाठी रत्नागिरीतून एसटी बस सोडण्यात येणार आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 17 वर पोहचली असून त्यापैकी पाच रूग्ण बरे झाले आहेत. तर एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरज येथे पाठविण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांचे अहवाल आज सायंकाळी उशिरा मिळाले आहेत. 74 अहवाल मिळाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामध्ये गुहागर 6, दापोली 15,कामथे 14 ,मंडणगड 39 जणांचा समावेश आहे.




























































