
लॉकडाऊनमध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या असताना एका मराठमोळ्या तरुणाने चक्क या लॉकडाऊनचा फायदा घेत ऑनलाईन मासे विकण्यास सुरुवात केली आहे. मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राचा डान्सिंग स्टार अशा रिॲलिटि शो मधून चमकलेला आणि रत्नागिरीत डान्स ॲकडमी चालवणाऱ्या किरण बोरसुतकर याने हा जबरदस्त फंडा आजमावला आहे.

रत्नागिरीत गेली १७ वर्ष डान्स क्लास चालवणाऱ्या किरणचा क्लास लॉकडाऊनमुळे बंद पडला. त्यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले. कमाई नाही, कर्जाचे हफ्ते फेडायचे आहे. घर चालवायचे आहे असे सर्वच प्रश्न त्याच्यासमोर असताना या डान्सरने घरात बसून न रहाता हात-पाय हलवायला सुरुवात केली. त्याने चक्क ऑनलाईन मासे विक्री सुरू केली. पत्नी स्नेहलच्या मदतीने त्याने ऑनलाईन मासेविक्री सुरू केली.व्हॉटसॲपवर माशांची ऑर्डर घ्यायची आणि ते मासे घरपोच द्यायचे हा व्यवसाय गेले पंधरा दिवस किरण बोरसुतकर करत आहे.डान्सर म्हणून ओळखीचा त्याला नव्या व्यवसायात फायदा झाला.शिवाय घरबसल्या ताज़े फडफडीत मासे मिळत असल्याने आता लोक किरणकडे फोन करून माशांचे बुकींग करत आहेत.
किरण २०११ मध्ये मराठी पाऊल पडते पुढे मध्ये चमकला होता. त्यानंतर स्टार प्रवाह वरील महाराष्ट्राचा डान्सिंग स्टार या रिॲलिटी शो मध्ये तो अंतिम फेरीत पोहचला. दूरदर्शनवरील कार्यक्रमात तो सहभागी झाला आहे. अनेक अल्बमसाठी त्याने कोरियाग्राफी केली आहे.रत्नागिरीत चित्रित झालेल्या अनेक चित्रपटात त्यांच्या डान्सिंग टीमने चुणूक दाखवली. त्यांच्या ॲकडमीतून अनेक कलाकार घडले आहेत.डान्स ॲकडमीवरच त्याचा उदरनिर्वाह सुरु होता.अचानक कोरोनाचं संकट आलं आणि सर्व काही ठप्प झाले.लॉकडाऊनमुळे डान्स ॲकडमी बंद झाली.संगीताच्या तालावर थिरकणारे पाय थरथरू लागले.पुन्हा डान्स ॲकडमी सुरु होईल का? मुले येतील का? असे प्रश्न डोक्यात थैमान घालत असताना काहीतरी नवा व्यवसाय तो शोधू लागला. त्यातूनच त्याला ऑनलाईन मासे विक्रीची आय़डीया सुचली.
किरणने त्यांच्या ॲकडमीत कोळीनृत्य शिकवली आहेत. डोक्यावर माशांची टोपली घेऊन नृत्य करणारा किरण बोरसुतकर लॉकडाऊनमध्ये मासे घेऊन तुमच्या दारावर येतो.हे सर्व अनुभव सांगताना किरण बोरसुतकर म्हणाला की,डान्स ॲकडमी बंद झाल्याने उत्पन्न बंद झाले होते.त्यामुळे ऑनलाईन मासे विक्रीची कल्पना मनात आली आणि त्यातून पोटापाण्याचा नवा मार्ग मिळाला.सध्या मी रविवार,बुधवार आणि शुक्रवारी मासे विकतो. ज्यांना मासे यापूर्वी दिलेत त्यांना फोन करून तुम्हाला उद्या मासे हवेत का? विचारतो. काही लोक व्हॉटसॲपवर ऑर्डर देतात. जेटीवर जाऊन मासे विकत घ्यायचे आणि ते घरपोच द्यायचे हा माझा व्यवसाय बनला आहे. याकामात पत्नीचे खूप सहकार्य मिळत असल्याचे किरण बोरसुतकर याने सांगितले



























































