
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्रांमध्ये लहान बालकांचे लसीकरण बंद आहे. त्यामुळे आपल्या अडीच महिन्याच्या मुलाला पोलिओ डोस कसा मिळेल, या चिंतेत असलेल्या मातेने ट्विटरच्या माध्यमातून पर्यावरणमंत्री, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी लॉकडाऊनच्या काळातही खासगी डॉक्टरच्या मदतीने बाळाला पोलिओ डोस उपलब्ध करून दिला. त्याबद्दल या मातेने सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
प्रभादेवी-वरळी येथे राहणाऱ्या पूर्वी भोसले या बाळंतपणासाठी पुण्याहून मुंबईत आल्या. बाळंतपणानंतर तान्हुल्याला अडीच महिन्याचा डोस द्यायचा असल्याने त्यांनी सर्व ठिकाणी विचारणा केली. लॉकडाऊनमुळे बाहेर जाताही येत नसल्याने त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पर्यावरणमंत्री, युुवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली आणि मदत मागितली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी या मातेला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि तसे निर्देश संबंधितांना दिले. युवा सेनेचे सिध्देश कदम यांनी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांना याबाबतची अधिक माहिती दिली. त्यानुसार त्यांनी पूर्वी भोसले यांच्याकडे संपर्क क्रमांक मागवून त्याद्वारे त्यांना कोणत्या प्रकारची मदतीची गरज आहे, याची माहिती घेतली. आरोग्य केंद्रात कोरोनामुळे लहान बालकांना स्पर्श करणे योग्य नसल्याने पालिका आरोग्य केंद्रात लसीकरण बंद करण्यात आले असल्याची माहिती केंद्रातील डॉक्टरने त्यांना दिली. मात्र, वरळी परिसरात एक खासगी डॉक्टर येत असून त्याच्या माध्यमातून हा डोस देता येईल, अशी माहिती दिली. त्या डॉक्टरला घोले यांनी त्यांना संपर्क करून या सगळ्याची कल्पना दिली आणि अडीच महिन्याच्या बाळाला अखेर पोलिओचा डोस मिळाला.
…आणि मातेची चिंता मिटली!
बाळाला पोलिओ डोस देण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीची दखल आदित्य ठाकरे यांनी केवळ घेतली नाही तर मला निश्चित वेळेत हा डोस उपलब्ध होईल, याची काळजी घेतली. पालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांचे तसेच डोस देण्यासाठी खासगी डॉक्टर घरापर्यंत आले, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नमुळे एका मातेची चिंता मिटली आहे, अशा शब्दांत पूर्वी भोसले यांनी आभार व्यक्त केले.































































