वाळूमाफियांचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला; दोनजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोदावरी नदीपात्रातून वाळूमाफियांकडून वाळूची तस्करी करण्याचे प्रकार वाढत आहे. या प्रकाराला विरोध केल्यास त्यांच्यावर हल्ल्या करण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना पालम तालुक्यातील साव॔गीथडी येथे शनिवारी रात्री घडली. वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले असून सात ते आठ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पालम तालुक्यातील गोदापात्रातील डिग्रस बंधाऱ्याततून नांदेडसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदापात्र कोरडे पडले आहे. याच पात्रातून वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळूचोरी करीत आहेत. चोरी करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी माफियांनी लोकेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम सुरू केले आहे. चोरट्या मार्गाने वाळू नेत असताना कोणी याचा विरोध केल्यास त्या व्यक्तीवर प्राणघातक स्वरूपाचा हल्ला करण्याचा प्रकार तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. अशीच घटना तालुक्यातील दुटका येथे नुकतीच घडली होती. या घटनेशी संबंधित माफियांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर चोरट्या मार्गाने सुरू असलेली वाळू तस्करी थांबेल असे वाटले होते.

कंठेश्वर येथील गोदापात्रात शनिवारी रात्री चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या कालीदास कदम, राजेश कदम, देवीदास कदम, नरहरी कदम, संदीप ढगे, तुकाराम कदम, सीताराम कदम, प्रशांत कदम यांच्यासह 30-40 जणांच्या जमावाने येथील सांवगीथडी येथील गावात येऊन गावातील ग्रामस्थांना लाठ्या-काठ्या , तलवारीचा धाक दाखवून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेवरून रमेश ठाकूर यांनी पालम पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वरील व्यक्तीसह 30 ते 40 जणांवर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड, पोलिस कॉन्स्टेबल गोविंद चुडावकर,एन. यु. राठोड करीत आहेत.