
राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे, मुंबईसह इतर राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवेश अधिक सुलभ झाला आहे. किणी( ता. हातकणंगले ) येथील टोल नाक्यावर बुधवारी सकाळी 11 वाजेपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे . यामुळे पुणे मुंबईसह अन्य ठिकाणांहून कोल्हापूर जिल्हयामध्ये येणाऱ्या परवानाधारक प्रवाशांचा वेळ व गर्दीचा त्रास कमी होणार आहे. मात्र, कणे गाव ते टोलनाका दरम्यानच्या किणी -घुणकी या गावातील व अन्य रस्त्याने छुप्या पद्धतीने प्रवाशी जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीलगत कणेगाव ( जि. सांगली ) येथे प्रशासनाने महामार्गावर तपासणी नाका महिन्याभरापासून सुरू केला आहे. या ठिकाणी पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची व वाहनांची काटेकोर तपासणी केली जाते. यामध्ये वाहनपरवाना तपासला जातो. प्रवासी,चालक, वाहक यांची आरोग्य तपासणी करुनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जातो. राष्ट्रीय महामार्गावरून होणारी वाहनांची वर्दळ व प्रवासीसंख्या यामुळे या तपासणी नाक्यावर 24 तास मोठी रांग लागते. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेशासाठी खूप वेळ लागतो. तसेच तपासणी नाक्यावर मुंबई, पुण्यासह अन्य भागातील रेड झोनमधून आलेल्या प्रवाशांची गर्दी येथील कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची होती.
याचा विचार करत प्रशासनाने बुधवारपासून किणी टोलनाक्याजवळ कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी स्वतंत्र तपासणी नाका सुरू केला आहे. या तपासणी नाक्यावर अद्ययावत पाच बूथ असून प्रवेश करनाऱ्यांचे परवाने, जाण्याचे ठिकाण, या सह अन्य आवश्यक बाबी पडताळून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सी. पी. आर., इचलकरंजी, आय.जी. एम. गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणीचे टोकन दिले जाते. याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीचे उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या परवानाधारक प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र तपासणी नाका सुरू केल्याचे सांगितले. तर किणी येथील तपासणी नाक्यावर मोठी गर्दी व वाहनांच्या रांगा लागलेचे चित्र होते. किणी टोलनाका व कणेगाव तपासणी नाक्यादरम्यान किणी, घुणकी गावातील अनेक छुपे रस्ते आहेत. या मार्गाचा वापर करून तपासणी नाका चुकवून हे प्रवासी गावागावात प्रवेश करण्याची शक्यता आहे . त्याचा मोठा धोका कोल्हापूर जिल्ह्याला आहे. यासाठी घुणकी व किणी दरम्यान छुपे रस्ते बंद करून अथवा बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.


































































