एकाचवेळी कोरोना आणि वन्यजीवांची भीती; शोधली नवी शक्कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेंदूपत्ता म्हणजेच विडी पाने संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर वाघ, अस्वलाचे हल्ले होत असल्यानं वनविभागानं नवी शक्कल लढवली आहे. जिथं पानं संकलित केली जातात, अशा जंगली क्षेत्रात फटाके फोडणं आणि डफडा वाजवणं सुरू केलं. या आवाजामुळं वन्यजीव पळून जातात आणि मजुरांना त्यांचं काम निर्धोक करता येतं. एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे वन्यजीवांची भीती, अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या तेंदू कामगारांची कशी काळजी घेतली जातेय.

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो लोक तेंदू पत्ता संकलनाच्या हंगामी कामाची वाट बघत असतात. वर्षभराची बिदागी याच कामातून ते करीत असतात. अवघ्या दोन महिन्यांच्या या हंगामात लोक कुटुंबासह पानं तोडायला जातात. कंत्राटदारासाठी हे मजूर काम करतात. कंत्राटदाराला मंजूर झालेल्या वनक्षेत्रात जाऊन ही पानं तोडायची असतात. भल्या पहाटे जाऊन नऊ-दहा वाजेपर्यंत हे मजूर पानं गोळा करून घरी परततात. पण हे काम करताना त्यांना जीवाची बाजी लावावी लागते. जंगलाच्या पोटात शिरून ही पानं गोळा करायची असतात. त्यांना कोणतंही संरक्षण नसतं. त्यामुळं या हंगामात अनेक मजुरांवर बन्यजीवांचे हल्ले होतात. काही जखमी होतात, तर अनेकांना जीव गमवावा लागतो. वाघ, अस्वल, बिबट्याचा अधिवास असलेल्या क्षेत्रात जाऊन त्यांना हे काम करावं लागतं. या व्यवसायातून मजुरांना जसा पैसा मिळतो, तसाच तो वनविभागाही मिळतो. त्यामुळं आता वनविभागानं या मजुरांच्या सुरक्षेचा एक नवा उपाय शोधलाय. मजूर काम करीत असलेल्या जंगलात फटाके फोडले जात असून डफ वाजवला जात आहे. या आवाजामुळं वन्यजीव दूरवर पळून जातात. त्यानंतर मजूर प्रवेश करतात आणि सुरक्षीत घरी परततात. सध्या हा उपाय मोठा उपयुक्त ठरला आहे. त्यामुळं मजुरवर्ग समाधानी आहे.