
बीडमध्ये कोरोना चे संकट फैलावत असतानाही नवनिर्वाचित भाजपा आमदार रमेश कराड यांनी चक्क सोशल डिस्टंन्सिंगला हरताळ फासला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कराड हे मास्क, ग्लोव्हज न घालता समर्थकांच्या गराड्यात गोपीनाथ गडावर आले होते. तेथे त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले मात्र यावेळी संचारबंदी असतानाही त्यांचे शेकडो कार्यकर्ते जमले होते व त्यांनी देखील कराडांसोबतच समाधीचे दर्शन घेतल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला भेटले.
एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा असे आवाहन प्रशासन करत आहे. मात्र,भाजपच्या लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं समोर आले आहे. कराड यांच्याकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोणतीही काळजी यावेळी घेण्यात आलेली दिसली नाही.आमदार कराड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































