
मास्क न घातल्याने पोलीस ठाण्यात प्रवेश दिला नाही म्हणून एका माथेफिरूने पोलिसाचा कान व हाताचे बोट कापल्याची धक्कादायक घटना मध्ये प्रदेशमधील अशोकनगर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या माथेफिरूला अटक केली आहे.
गुरुवारी हा माथेफिरू बहादुर नगर पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याने तोंडाला मास्क न लावल्याने पोलिसांनी त्याला मास्क लावून ये असे सांगितले. पोलिसांनी प्रवेश न दिल्याने तो आल्या पाऊली परत गेला मात्र काही वेळाने तो परत आला व पोलिसांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या हवालदार शाहिद खान यांनी त्याला हटकले. मात्र तो खान यांच्या अगदी जवळ येऊन बोलू लागला. खान यांनी त्याला लांब उभे राहून बोलण्यास सांगितले. त्यानंतर त्या माथेफिरूने स्वत:कडील चाकू काढून खान यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मानेवर चाकूने वार केल्यानंतर त्याने त्यांचा कान कापला. माथेफिरूला अडवायला गेलेल्या हवालदार राजेश परिहार यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यातून पळून गेला मात्र पोलिसांनी काही वेळातच त्याला अटक केली. आरोपी माथेफिरू हा आदिवासी तरुण असून तो फार रागिट असल्याचे त्याच्या गावकऱ्यांनी सांगितले.





























































