
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी सकाळी अशा एकूण 7 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथील (3), यावलपिंप्री (1), पारडगाव (1), राजेगाव (2) असे एकूण 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी सांगितले.
पांगरा येथील पॉझिटिव्ह आलेल तीनजण शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या संपर्कात आले होते. राजेगाव येथील 7 जण चार दिवसांपूर्वी मुंबईवरून आले होते. त्यातील 2 जण पॉझिटिव्ह निघाले. ते गावात येण्यापूर्वीच त्यांना घनसावंगी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा गावकऱ्यांशी कुठलाही संपर्क आला नसल्याचे राजेगाव येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती पूजा सपाटे यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 23 वर पोहोचली असून बाहेरील जिल्ह्यातून आणि रेडझोनमधून आलेल्यांवर प्रशासन नजर ठेवत असून संशयितांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती टीएचओ डॉ. नागेश सावरगावकर यांनी दिली. घनसावंगी तालुक्यात मुंबई, पुणे येथून आलेले नागरिक पॉझिटिव्ह येत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.






















































