
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 10 जून रोजी लातुर जिल्ह्यातील एकुण 56 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नवीन 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 2 जणांचे अहवाल अनिर्णित असून 7 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका रुग्णाचा 9 जून रोजी (मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान) मृत्यु झाला असुन हा रुग्ण 2 जून रोजी सोलापुर येथुन प्रवास करुन आला होता. त्यानंतर त्यांना भुक लागत नव्हती, अशक्तपणा येत होता त्यामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण औसा येथील कादरी नगर येथील असुन त्यांना पुर्वीपासुनच किडनीचा आजार, उच्च् रक्तदाब व मधुमेह होता, त्यांचे दोन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. सदर रुग्ण दाखल झाल्यापासुन ऑक्सिजनवर होता. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झालेला आहे.
तसेच 10 जून रोजी एका रुग्णाचा मृत्यु झालेला आहे. हा रुग्ण 28 मे रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण मोती नगर, लातुर येथील असुन कुटूंबातील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोना (कोविड 19) ची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासुन ते ऑक्सीजनवर होते, दिनांक 4 जून पासुन ते व्हेंटीलेटरवर होते. कोरोनामुळे त्यांना न्युमोनिया झाला होता व अगोदरपासुनच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मृत्यु झालेला आहे अशी माहिती डॉ. राजेश बोबडे सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग व डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख यांनी दिली.



























































