
>> नीलेश कुलकर्णी
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ही निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे भाजपने जाहीर केले आहे. त्याचवेळी आपला 73वा वाढदिवस रांचीच्या तुरुंगात साजरा करणार्या लालूप्रसाद यादव यांच्या भ्रष्टाचाराची 73 प्रकरणे उघड करणारी पोस्टरबाजी विरोधकांनी त्याचदिवशी केली. एका अर्थाने लालू आणि त्यांचा ‘कंदिल’ राजकीयदृष्ट्या मंदावला असला तरी बिहारी राजकारणात लालूंशिवाय गत्यंतर नाही आणि ही निवडणूकही लालू विरुद्ध नितीशकुमार अशीच होईल हे स्पष्ट झाले आहे.
‘जब तक रहेगा समोसे में है आलू, तब तक बिहार में रहेगा लालू’, ही लालूप्रसाद यादव यांच्या समर्थकांची आवडती घोषणा कालपरत्वे मागे पडली असली तरी बिहारच्या राजकारणाला लालूंशिवाय गत्यंतर नाही, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. रांचीच्या तुरुंगात आपला 73 वा वाढदिवस लालू यांनी गेल्या आठवड्यात साजरा केला. मात्र याचे निमित्त साधत लालू यांच्या 73 भ्रष्टाचाराच्या कहाण्या उघड करणारे पोस्टर्स बिहारमध्ये लावण्यात आली. खरं तर भ्रष्टाचार वगैरे आरोपांची लालू यांना आता सवयच झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा त्याच आरोपांवरून लालू अडचणीत येतील किंवा त्यांना फरक पडेल असे समजण्याचे कारण नाही. उलट तुरुंगात असूनही विरोधक या वयात त्यांना घेरत आहेत अशी सहानुभूती नौटंकीमध्ये तरबेज असलेले लालू निर्माण करू शकतात. तसे झाले तर त्याचा तोटा विरोधकांना होऊ शकतो.
लालू आणि त्यांचा राष्ट्रीय जनता दल सध्या बिहारच्या राजकारणात कमजोर असले तरी बेदखल झालेला नाही. नितीशकुमार यांनी जरी लालूंची एकाधिकारशाही संपवून स्वत:ची ‘सुशासन बाबू’ अशी प्रतिमा निर्माण केली असली आणि लालूंपेक्षा भरीव राजकीय यश मिळवले असले तरीही बिहारी जनतेमध्ये लालू नावाचा करिश्मा संपवणे त्यांना शक्य झालेले नाही. दुसरीकडे लालू यांची प्रतिमा ‘भ्रष्टाचाराचा मसिहा’ अशी बनविणार्या भाजपलादेखील ते शक्य झालेले नाही. त्यामुळे यापुढील निवडणुकीतही लालू यादव यांची एक ‘स्पेस’ राहील हे नक्की. ही निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा भाजपने केलीच आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकही लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लालू आणि नितीशकुमार या दोन पट्टशिष्यांमध्ये होईल हे स्पष्ट झालेले आहे.
लालूंवर चिखलफेक करून भाजपसह इतर विरोधकांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले खरे, मात्र लालूंचा मुकाबला करू शकेल, असा एकही नेता अनेक वर्षांनंतरही भाजपला त्या राज्यात तयार करता आलेला नाही. सी. पी. ठाकुरांपासून हुकूमदेव नारायण यादव, गिरिराजिंसग, शत्रुघ्न सिन्हा, रविशंकर प्रसाद, अश्विनी चौबे, राजीवप्रताप रूडी, सुशीलकुमार मोदी असे अनेक `प्रयोग’ भाजपने करून पाहिले. मात्र हे नेते लालूंच्या पासंगालाही पुरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नितीशबाबूंच्या गळ्यात `आघाडीची माळ’ बिहारच्या सत्तेचा सोपान भाजपने गाठला. गेल्या पाचही निवडणुका बिहारात नितीशबाबूंच्या इमेज भोवतीच फिरल्या आणि त्या त्यांनी जिंकल्याही! अर्थात या सगळ्याच निवडणुकांत विरोधकांचे टार्गेट होते ते एकमेव लालू. अर्थात मागील काही वर्षांत लालू यादव यांच्या कुटुंबातील कलहामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात एकवाक्यता नाही. लालूंचे तेजप्रताप नावाचे चिरंजीव तर वेगवेगळ्या वेषांतराच्या अवतारामुळे चर्चेत असतात. तेजस्वी यादव यांनी चुणूक दाखविली असली तरी त्यांना नेतृत्व सिद्ध करता आलेले नाही. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंनी सत्तरी पार केलेल्या जेपींच्या लालू व नितीश या दोन शिष्यांना कमरेला लंगोट गुंडाळून राजकीय आखाड्यात उतरावे लागले आहे. लालूंच्या वाढदिवसाला विरोधकांनी पोस्टरबाजी केली असली तरी रफटफ इमेज असलेल्या बेदरकार लालूंना अशा `पोस्टर वॉर’ने फरक पडणार नाही. उलट या निमित्ताने मुस्लिम-यादव या `मायी’ समीकरणाने लालूंनी सहानुभूतीची लाट निर्माण केली तर विरोधकांना अडचणीचे ठरू शकते. त्याचा फटका नितीशबाबूंना बसू शकतो. अगोदरच लॉक डाऊनमुळे केंद्र सरकारवर प्रचंड रोष असलेल्या (स्थलांतरित मजुरांची संख्या यूपीनंतर बिहारमध्ये सर्वाधिक आहे) जनतेचा मोठा तडाखा भाजपामुळे नितीशबाबूंनाही बसू शकतो. `व्हच्र्युअल रॅली’द्वारे अमित शाह यांनी बिहारच्या प्रचाराचा नारळ वाढविला असला तरी, कोरोना आणि लॉक डाऊन हाताळण्यात केलेल्या गफलतीमुळे यावेळी नितीशबाबूंचा विजयाचा नारळ फुटणे भलतेच कठीण जाईल, हे निश्चित.
‘हँगिंग गार्डन’
‘पोस्टर वॉर’ केवळ बिहारातच सुरू नाही तर मध्य प्रदेशमध्येदेखील सुरू आहे. अर्थात ते दोन पक्षांत नसून शिस्तप्रिय अशा भाजपच्या दोन गटांमध्ये सुरू आहे. केंद्रीय मंत्रिपदाच्या आश्वासनामुळे काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हातात धरलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची अवस्था सध्या `हँगिग गार्डन’मध्ये लटकल्यासारखी झाली आहे. कोरोनामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. त्यातच विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या समर्थकांना तिकीट मिळते की नाही, याची धास्ती असल्याने मुख्यमंत्री शिवराजिंसग चौहान आणि शिंदे यांच्यामधली तणातणी वाढली आहे. ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांना गांधी फॅमिलीचे मेंबर असल्याप्रमाणे दहा जनपथवर सहजसुकर प्रवेश असे. आता भाजप हा वेगळा पक्ष आहे, हे एव्हाना शिंदे यांच्या लक्षात येऊ लागले आहे. शिवराज यांची `तक्रार’ करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांना फोन लावला. मात्र, आठवड्यानंतरही हे बडे नेते शिंदे यांच्या फोनलाइनवर आले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शिंदे यांची कशीबशी समजूत घातली. मध्यंतरी शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून `भाजप नेता’ ही ओळख काढून टाकली. मात्र त्याची दखल कोणी घेतली नाही. उलट केंद्रीय मंत्री नरेंद्रिंसग तोमर आणि ग्वाल्हेरचे खासदार विवेक शेजवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप नेत्यांचे पोस्टर्स लागले. सरदार घराण्यातल्या शिंदे यांना त्या पोस्टरवरही स्थान मिळाले नाही.
देवगौडांचा ‘संदेश’
माजी पंतप्रधान म्हणून हरदनहळळी देवगौडांबद्दल एक आदराची भावना आहे. 87 व्या वर्षी `बुढ्ढा होगा तेरा बाप’ असे म्हणत देवगौडा राज्यसभेच्या निवडणुकीत उभे राहिले आणि बिनविरोध निवडूनही आले. वास्तविक नव्वदीकडे झुकलेले देवगौडा राज्यसभेचा मोह टाळू शकले असते. मात्र सोनिया गांधींच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढल्याचा दावा आता ते करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बसवराज यांनी तुमकूरमधून देवेगौडा यांचा पराभव केला. या निवडणुकीत संपूर्ण देवगौडा कुटुंबाला कानडी जनतेने सन्मानाने घरी बसवले. गमतीचा भाग म्हणजे त्यावेळी देवगौडांचे नातूही निवडणूक लढवत होते. आजोबा आणि नातवंडांना जनतेने `सुट्टी’ दिली असली राजकीय उचकी काही स्वस्थ बसू देत नाही. गेली अनेक वर्षे देवेगौडा लोकसभेचे सदस्य होते. लोकसभेत त्यांनी अलौकिक कार्य केल्याची नोंद नाही. तथापि राजकारणात `अजून यौवनात मी’ हा संदेश सातत्याने विरोधकांना द्यावा लागतो. कदाचित तसाच संदेश वयाच्या 87 व्या वर्षी राज्यसभेत पोहोचून देवेगौडा यांनी दिला असावा. राजकारणात `करिअर’ करू पाहणार्या तरुणांना एक प्रकारे देवेगौडा यांनी `बुढ्ढा होगा तेरा बाप’ असेच सांगितले आहे!






















































