
लडाखमधील सीमाभागात गलवान घाटी आणि पेगाँग सरोवराच्या परिसरात गेल्या महिन्यात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्यापासून दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. हा वाद आता अधिक चिघळला असून दोन देशांच्या सैनिकांमधील ताणतणाव वाढला. दोन्ही देशांत सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती. मात्र, सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू असतानाच चीन आणि हिंदुस्थानी सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात हिंदुस्थानी लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. हिंदुस्थानी सैन्यानेही चीनच्या पाच सैनिकांना ठार केले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत लवकरच संपूर्ण माहिती देशाला देण्यात येईल असेही लष्कराकडून सांगण्यात आले.
गलवान घाटीत सुरू असलेल्या सैन्य माघारीच्या प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक घटना घडली. यावेळी झटापटीत एक हिंदुस्थानी अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. तर चीनचे पाच सैनिकही ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच चीनचे 11 सैनिक जखमी झाले आहेत. या संघर्षात दोन्ही बाजूकडून गोळीबार करण्यात आला नाही. चीनच्या सैनिकांकडून लाठ्या, काठ्यांनी हल्ला चढवला आणि दगडफेक करण्यात आली. हिंदुस्थानी सैन्यानी बचाव करत त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंचे वरिष्ठ सैन्य अधिकारी दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी बैठक घेत आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
या घटनेची दखल घेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सीडीएस बिपीन रावत आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरदेखील या बैठकीला उपस्थित होते. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी त्यांचा पठाणकोट लष्करी तळाचा दौरा रद्द केल्याची माहितीही मिळाली आहे. हिंदुस्थान आणि चीनमधील लाइन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर 45 वर्षानंतर जवान शहीद होण्याची घटना घडली आहे. चीनकडून 1975मध्ये लाइन ऑफ कंट्रोलवर गोळीबार करण्यात आला होता.


























































