पालिकेची ‘फाईट द बाईट’; ड्रोन कॅमेरा डेंग्यू-मलेरियाला शोधून मारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या ‘फाइट द बाईट’ उपक्रमात आता ड्रोन कॅमेरा बंद मिल, उंच, दाटीवाटी आणि अडगळीच्या ठिकाणच्या डेंग्यू-मलेरियाला शोधून मारणार आहे. ड्रोन कॅमेर्‍याने डेंग्यू-मलेरियाच्या उत्पत्तीस्थाने शोधण्यास सुरुवात केल्यानंतर पालिकेने आता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचा निर्णयही घेतला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

पालिकेच्या जी-दक्षिण म्हणजेच वरळी, लोअर परळ विभागात या अभिनव उपक्रमाची सुरुवात होत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पालिकेच्या जी-दक्षिण विभाग अधिकार्‍यांची बैठक घेऊन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना वेगाने करण्याचे निर्देश दिले. यावेळी जी-दक्षिण विभागात डेंग्यू-मलेरियाची उत्पत्तीस्थाने ड्रोन कॅमेर्‍याने शोधून या ठिकाणी किटकनाशक फवारणीही करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. यावेळी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले हेदेखील उपस्थित होते. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जी-दक्षिण विभागातील वॉर रूमची पाहणीही केली. गतवर्षी डेंग्यू-मलेरियाची ठिकाणे आढळलेल्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी पोलीस मैदानावर कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणीही केली. यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले. रुग्णांना बेडची कमतरता पडू नये यासाठी खासगी रुग्णालयांची योग्य समन्वय साधावा असेही त्या म्हणाल्या.

आपत्कालीन स्थितीतही ड्रोन वापरणार

पालिकेच्या जी-दक्षिण विभाग परिसरात काही मिल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. शिवाय मुंबईच्या अनेक भागांत उंच इमारती, झोपडपट्ट्यांवर असणार्‍या ताडपत्री, रेल्वे रूफ, मोनो रेल अशा ठिकाणी कामगार पोहचून किटकनाशक फवारणी करू शकत नाहीत. अशा ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यू-मलेरिया डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे ड्रोनने फवारणी करण्यात येणार आहे. आगामी काळात आपत्कालीन स्थिती, आग, पाणी साचणे किंवा कुठल्याही प्रकारच्या दुर्घटनेत ड्रोनच्या माध्यमातून बचावकार्य करण्याबाबत पालिका कार्यवाही करीत असल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे किटकनाशक अधिकारी बी. आर. भानसी यांनी दिली.