विश्वासघातकी चीनविरोधात देशभरात संताप, कोल्हापूर येथे शिवसेनेकडून चीनच्या राष्ट्रध्वजाची होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वासघातकी चीनने पुन्हा एकदा मैत्रीला तडा देत, हिंदुस्थानी सैन्यावर हल्ला केला. यामध्ये कर्नलसह वीस जवान हुतात्मा झाले. त्यामुळे चीन विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर शिवसेनेच्यावतीनेही आज कागल येथे चीन विरोधात निदर्शने करण्यात आली. चीनच्या राष्ट्रध्वजाची जाहिर होळी करुन, तीव्र संताप व निषेध व्यक्त करण्यात आला.

चीनच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हिंदुस्थानी जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन चीनच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. यावेळी शिवसैनिकांनी चीन मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. चीनच्या या भ्याड हल्ल्याला हिंदुस्थान सरकार योग्य ते उत्तर देईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला. तर यासाठी हिंदुस्थान सरकार आणि आपल्या सैन्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सदैव तत्पर राहतील असा विश्वास जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, संभाजी भोकरे, शिवगोंड पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.