…तर विधान परिषदेच्या आमदारकीची ब्यादच नको, स्वकीयांच्या टीकेला राजू शेट्टी वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजपर्यंत मी अनेक प्रसंगांना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले; पण इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरून झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरून येतात, पण घरच्या कटय़ारीचे वार जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधान परिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वकीयांकडूनच होणाऱया टीकेवर वैतागून ही भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोटय़ातून नियुक्तीचा प्रस्ताव शेट्टी यांनी स्वीकारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नेत्यांकडून टीका होऊ लागल्याने शेट्टी यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. दोनच दिवसांपूर्वी शेट्टी यांनी बारामतीत शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी चर्चा करून हा प्रस्ताव स्वीकारला होता.

राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये विधान परिषदेवर जाण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी झालेल्या घडामोडींचा आढावा घेतला आहे. राज्यपालांच्या कोटय़ातून ज्या बारा जागा विधान परिषदेवर सरकारमार्फत शिफारस करून पाठवायच्या आहेत, त्यापैकी एक जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वतः जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते.

12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांनी एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले होते. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले; पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरून झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरून येतात, पण घरच्या कटय़ारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधान परिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच. विधान परिषदेच्या जागेवरून कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही.

एकमेकांना जखमी करू नका
स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ उभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करू नये. एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधान परिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू नये.