
तांबडा-पांढरावर ताव मारायचा आणि सभेत गोंधळ घालायचा यासाठी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. याची जाणीव पदाधिकारी व सदस्यांनी ठेवावी. तसेच यंदा पंचायत सशक्तीकरण योजनेत आपल्या जिल्ह्यातील एकही गाव नसल्याची लाज वाटली पाहिजे अशा कडक शब्दात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाधिकार्यांना व सदस्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच यापुढे असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आज जि. परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. गावाच्या विकासाचे स्वप्न घेऊन कार्यकर्ता जर काम करू लागला तर तो गाव समृद्ध करू शकतो. पण जि.परिषदेत तसे होताना दिसत नाही. बाहेर लोक काेरोनाशी लढत असताना, जि. परिषदेत जर मटणाच्या जेवणावळी करू लागला तर लोकांनी तुमचा काय आदर्श घ्यायचा? असा सवाल च मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वसाधारण सभा घेण्यावरून झालेला गोंधळ योग्य नाही. तुम्हाला जेवण पाहिजे असेल तर मला सांगा मी शासकीय विश्रामधामवर व्यवस्था करतो, पण यापुढे जि.परिषदेत असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा सुचक इशाराच मुश्रीफ यांनी दिला.
दरम्यान पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण अभियानात पुरस्कार मिळालेल्या गावांच्या प्रशस्तीपत्रावर सही करताना, यात आपल्या जिल्ह्यातील एकही गाव दिसले नाही. पण जिल्ह्यातील एका घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याच्या पत्रावर आपणाला सही करण्याची वेळ आल्याची जाहीर खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षकांनीच शाळांचा व शिक्षणाचा दर्जा वाढवावा असे आवाहनही त्यांनी केले.
देश घडविणारी माणसे जिल्हा परिषद शाळांमधूनच तयार झाली आहेत. तीच परंपरा पुढे राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,ब्उपाध्यक्ष सतिश पाटील, शिक्षण सभापती प्रविण यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.





























































