
रत्नागिरीत कोरोनाचे 8 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 484 वर पोहोचली आहे. रविवारी कोविड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 2 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 351 झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची प्रमाण 72 टक्के आहे.
जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यु झाला. यामध्ये कापडगाव येथील पुरुष रुग्णाला (वय 53 वर्षे) मधुमेहाचा आजार होता. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले होते. तर भिले, कुंभारवाडी, ता. चिपळूण येथील महिला रुग्णालाही (वय 70 वर्षे) मधुमेहाचा आजार होता. या महिलेस महिला कक्षात ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19 झाली आहे.
सध्या रुग्णालयात रुग्णांची संख्या 115 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 51 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 282 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 990 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 484 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 7 हजार 486 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 292 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 92 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 162 अहवाल मिरज आणि 126 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.



























































