
लष्करी अळीचे थैमान रोखण्यात अपयश आल्याने देवळा तालुक्यातील विठेकाडी येथील शेतकऱ्याने चार एकराकरील मका पीक नांगर फिरवून उद्ध्वस्त केले. गेल्या पंधरा दिवसांपासून कसमादे भागात लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे 50 टक्के क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले आहे. या भागात मका हेच खरीपाचे प्रमुख पीक आहे. गेल्या दोन आठवडय़ात 80 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आठ दिवसातच लष्करी अळीचे थैमान सुरू झाले.
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील माजी सरपंच नंदलाल निकम यांनी पाच एकर क्षेत्रात मका लागवड केली होती. किटकनाशक फवारूनही अळी आटोक्यात न आल्याने त्यांनी चार एकरावरील उभ्या कोवळ्या पिकावर नांगर फिरवला. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून पीक वाचवण्यासाठी मार्गदर्शन करावे. नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


























































