
लॉकडाऊन शिथील होऊन ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आता वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरिता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी राज्य स्तरीय (कृतीदल) टास्कफोर्स नेमण्यात आला आहे.
कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 8 जूनपासून खासगी आणि सरकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी 15 जूनपासून मर्यादित प्रमाणात लोकल सेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बेस्टने विरार, पनवेल आणि कर्जतपर्यंतच्या अत्यावश्यक फेऱ्या बंद केल्या असून केवळ फिडर रूट सुरू ठेकले आहेत. त्यातच काळ्या पिवळ्या टॅक्सी सेवाही केवळ अत्याकश्यक कारणासाठीच विमानतळ, रेल्वे टर्मिनस आणि हॉस्पिटलसाठी सुरू आहेत.
वाहतुकीच्या उपाययोजनेचे काम करणार
कोविड-19 मुळे निर्माण होणारा संसर्ग टाळण्याबरोबरच वाहतूकीसंदर्भात विविध उपाय योजण्याकरिता विविध मालवाहतूक संघटना, प्रवासी वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम आदी प्रतिनिधींच्या मदतीने राज्यस्तरिय एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या कृती दलाचे अध्यक्ष परिवहनमंत्री स्वतःच असणार आहेत. तर परिवहन मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक वाहतूक, बेस्टचे महाव्यस्थापक, ट्रक, टेम्पो, बस वाहतूक महासंघाचे प्रतिनिधी, रिक्षा टॅक्सी संघटनाचे प्रतिनिधी, वेब बेस्ड टॅक्सी ओला व उबरचे प्रतिनिधी आणि परिवहन आयुक्त या टास्क फोर्समध्ये असणार आहेत. या काळात वाहतूकीच्या उपाययोजनाचे व्यवस्थापन करण्यासाठी हा टास्कफोर्स मदत करणार आहे.



























































