
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला. ‘गोपीचंद पडळकर हाय हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद गोपीचंद पडळकर मुर्दाबाद, गली गली मे शोर है गोपीचंद पडळकर चोर है’ अशी घोषणाबाजी करीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून राज्याच्या विविध भागात पडळकर यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत.
गुरूवारी कुडाळ उद्यमनगर येथे मुंबई – गोवा महामार्गावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध व्यक्त केला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडून पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा महामार्गापर्यंत काढण्यात आली होती.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे अत्यंत घाणेरडे वक्तव्य करणाऱया पडळकरांविरोधात महाराष्ट्रात सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर भाजप नेत्यांनी पडळकरांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे.
भाजपच्या पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करताना ही भाजपची संस्पृती आहे का, असा सवाल करत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नेम आणि फेम मिळवण्यासाठी पवारांवर टीका केली जाते. बिरोबा यांना सुबुद्धी देवो, पातळी सोडून टीका केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.


























































