
हिंदुस्थान आणि चीनमधील वाढता तणाव लक्षात घेता सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचा परिणाम आता मुंबईतील हॉटेल व्यवसायावरदेखील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या काळात मुंबईतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना नो एंट्री देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे.
हिंदुस्थान चीनच्या सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे. या तणावाचे वातावरणामुळे देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कॉन्फरेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने यासाठी एक मोहीमसुद्धा चालविण्यात आली आहे. या अंतर्गत त्यांनी ‘भारतीय सामान हमारा अभियान’ ही एक राष्ट्रीय मोहीम सुरु केली असून या मोहीमेच्या अंतर्गत मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता अनेकांनी चिनी नागरिकांना त्यांच्या हॉटेलामध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच यासंदर्भात निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या हॉटेलांमध्ये मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांचा सहभाग नाही. या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या मोहिमेसंदर्भात बोलताना कॉन्फरेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडसचे अध्यक्ष बिसी भरतीया म्हणाले की, सध्या हिंदुस्थानात कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय उड्डाण होत नाहीत. पण भविष्यात उड्डाणे सुरु झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात चिनी मुंबई, पुणे, आग्रा आणि बंगळरु या शहरांमध्ये येतात. सध्या आम्ही या सर्व शहरातील हॉटेल व्यावसायिकांची चर्चा करीत असून त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही त्यांना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.





























































