अनंतनागमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; महिन्याभरात 36 दहशतवादी यमसदनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या अनंतनागमधील रुनीपोरा परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे सापडली आहेत. सुरक्षा दलाने घटनास्थाळाहून एक एके 47 रायफल आणि 2 पिस्तूल जप्त केल्या आहेत. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम राबवण्यात येत आहे. सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊटला वेग दिला आहे. या महिन्याभरात सुरक्षा दलाने 36 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

अनंतनागच्या रुनीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एसओजी, राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या जवानांनी शोधमोहिमेला सुरुवात केली. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेराव घातला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाईला सुरुवात केली. काही तास सुरू असलेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. त्यात एका कमांडरचाही समावेश आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने परिसरात शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढल्याने सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊटला वेग दिला आहे. दक्षिण कश्मीरमध्ये या महिन्यात झालेली ही 13वी चकमक असून आतापर्यंत सुरक्षा दलाने 36 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू कश्मीरमध्ये आता थंडी आणि पावसाळा सुरु होणार आहे. त्याचा गैरफायदा घेत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असतो. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात येतो. मात्र, सुरक्षा दल सज्ज असून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यात येत आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊटलाही गती दिली आहे.