
आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. येत्या 1 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे या उभयतांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. ठाकरे दांपत्य मंगळवारी पंढरपूरमध्ये मुक्कामी येत आहेत. पहाटे अडीच वाजता उभयता श्री विठ्ठल रखुमाईच्या महापूजेत सहभागी होतील.
कोरोनाच्या सावटामुळे वारीचा हा सोहळा ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात साजरा होत असून नेहमी वारकऱ्यांनी गजबजलेला चंद्रभागेचा तीर आज सुनासुना दिसत आहे. कोरोनामुळे या पूजेच्या उपस्थितीवर कडक निर्बंध आणले गेले आहेत. आषाढी वारी हा पंढरपूर मधील महासोहळा या सोहळ्याकडे महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविकांचे लक्ष लागलेले असते. कोरोनामुळे यंदा वारी चुकणार असल्याने भाविकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. तथापि श्री विठ्ठलाचे दर्शन घरबसल्या व्हावे यासाठी महापूजेचे दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
कोरोनाने साऱ्या देशाला वेठीस धरले आहे. त्यातून पंढरपूरच्या वारीची सुटका झाली नाही. कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक एकत्र आले, तर भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. हे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तथापि शेकडो वर्षाची वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी या वारीला फक्त मानाच्या नऊ पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. साधारण 200 वारकरी भाविकांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी प्रातिनिधिक स्वरुपात वारी पोहोचती केली जाणार आहे. मानाच्या पालख्यातील भाविकांशिवाय इतर कोणत्याही वारकऱ्यांना पंढरपूर शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे. दक्षता म्हणून पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.
































































