सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांची संख्या 214 वर; 2 ते 8 जुलैदरम्यान जिल्हात लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्हात कोरोनाबाधितांची संख्या 214 वर पोहचली आहे. तर मंगळवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 5 झाली आहे. त्यामुळे जिल्हात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 2 ते 8 जुलैदरम्यान जिल्ह्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली. या काळात पुर्वीसारखा कडक पोलीस बंदोबस्त राहिल असेही जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनच्या काळात फळे, भाजी, दुध, मासे, औषधे, किराणा आदि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिवाय अनावश्यक लोक बाहेर पडू नये, दुकाने आणि बाजारपेठांमधे सध्या होणारी गर्दी थांबावी या हेतूने हे लॉकडाऊन करण्यात येत आहे. कृषी विषयक कामे व सेवाही सुरु राहणार आहेत. सरकारी निमसरकारी कार्यालयात 10 टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील सरकारी निमसरकारी विभाग पूर्णपणे सुरु असतील. बाहेरुन येणार्‍या लोकांना होम क्वारंटाईनही सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांनी वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातून परराज्यात जाणार्‍या नागरिकांना ईपास घेउन रत्नागीरी रेल्वे स्टेशनपर्यन्त पोहचता येईल. तसेच अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे. मात्र, कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय आढळल्यास नागरीक व त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. पुर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहन जप्तीची कारवाई होईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त आणि पोलीस कार्यवाही होणार आहे. असेही ते म्हणाले.

जिल्ह्याच्या सीमा पुन्हा सील
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 2 ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहिर केले आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईसह अन्य जिल्ह्यातून इ पास घेवून येणाऱ्या नागरिकांनाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

सायंकाळी 5 ते सकाळी 9वाजेपर्यंत कर्फ्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 2 ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊन करण्यात आले असतानाच सायंकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. या कालावधीत कोणी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक करवाई केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.