रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, आयआरसीटीसी तोटय़ाच्या ट्रॅकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने पीपीपी मॉडेल अंतर्गत मुंबईसह 112 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी ‘इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पेरेशन लिमिटेड’ला (आयआरएसडीसी) दिली आहे. त्यामुळे या स्थानकांचा पुनर्विकास करताना ही स्थानके कंपन्यांच्या नावे भाडे तत्वावर दिली जाणार असल्याने ज्या मोठय़ा स्थानकांत रेल्वेची खानपान सेवा पुरविणाऱया आयआरसीटीसी कंपन्यांचे बेस किचन आहेत, त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे.

आयआरएसडीसीने पुनर्विकास करण्यासाठी निवडलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीत मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल आदी मोठी स्थानके आहेत. या स्थानकांत रेल्वेची उपकंपनी आयआरसीटीसीची बेस किचन्स आहेत. या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ‘पीपीपी मॉडेल’चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे ही स्थानके भाडे तत्वावर खाजगी कंपन्यांच्याकडे जातील. तसेच या स्थानकांवरील प्रवाशांना सेवा प्रदान करण्याचा अधिकार पीपीपी विकास करारानूसार या कंपन्यांकडे जाणार आहे. त्यामुळे आयआरसीटीसीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या बेस किचन्सच्या तसेच इतर कंत्राटी फूड मॉड, तसेच विविध कंपन्यांना स्टॉल्ससाठी दिलेली कंत्राटे अडचणी येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

पुनर्विकासाच्या यादीत जादा उत्पन्न देणारी स्थानके
‘आयआरएसडीसी’च्या वेबसाईटवर कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासासाठी वापर होणार असल्याचे म्हटले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलसारख्या काही स्थानकांचा विकास रेल लँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीकडून (आरएलडीए) करण्यात येणार आहे. 26 जून रोजी आयआरएसडीसीने नागपूर सह रेल्वेच्या चार स्थानकांच्या पीपीपी विकासासाठी निविदा उघडल्या असून 32 कंपन्यांनी या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.