90 दिवसांच्या क्रेडिटच भूत अजूनही मानगुटीवर! पैसे थकविणार्याक मालिका निर्मात्यांवर हेमांगी कवी संतापली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटातही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार पुन्हा कामाला लागले असून मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, कलाकारांना 90 दिवसांनी देण्यात येणाऱ्य़ा इंडस्ट्रीमधील पेमेंट सिस्टीमवर अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.


फेसबुक पोस्टमध्ये हेमांगी म्हणाली, बऱ्य़ाच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान मस्त! पण ते 90 दिवसांच्या क्रेडिटचे भूत अजूनही मानगुटीवर आहे. आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर असे ती म्हणाली. कर्ज घेतलेल्या बँकेत कसे पाऊल ठेकायचे ? इन्श्युरन्सचे हप्ते कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचे काय? असे प्रश्न तिने उपस्थित केले आहे. कलाकार आणि टेक्निकल टीमकडून निर्मात्यांनी पूर्ण सहकार्याची अपेक्षा करायची मात्र पैशांच्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही अशी खंत देखील तिने व्यक्त केली आहे.
क्रेडिट 30 दिवसांचे ठेवा!

आता तर न्यू नॉर्मल सुरू झालंय. कलाकाराने स्वतः मेकअप, हेअर, कॉश्च्युम करायचे, स्वतःच स्पॉट दादा व्हायचे आणि मुख्य म्हणजे केळेत शिफ्टला यायचे. पण पेमेंटचं टायमिंग काय? कॉन्ट्रक्टमध्ये तसे लिहूनच येतंय म्हणजे ज्याला काम करायचेय तो करेल. निदान काही महिने तरी 30 दिवसांचे क्रेडिट ठेवा, अशी अपेक्षा तिने व्यक्त केलीय.