
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे मुंबईसह राज्यभरातील विजेची मागणी घसरली आहे. जूनअखेरीस महावितरणकडे दररोज 16 हजार 500 मेगावॅट विजेची मागणी नोंदली जात होती, मात्र पावसामुळे कृषी पंपाच्या वीज वापरात मोठी घट झाल्याने सध्या विजेची मागणी 14 हजार मेगावॅट पर्यंत खाली आली आहे. तसेच मुंबईतही विजेच्या मागणीत 250-300 मेगावॅटची घट झाली आहे. त्यामुळे वीज निर्मिती प्रकल्पांना विश्रांती मिळाली आहे.
लॉकडाऊन काळात राज्याची विजेची मागणी 12 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती, तर मुंबईची मागणी 1500 मेगावॅटची घट झाली होती. त्यानंतर जूनमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच महावितरणकडे दररोज 16-17 हजार मेगावॅट तर मुंबईत 2400 मेगावॅट पर्यंत विजेची मागणी नोंदली जात होती. त्यामध्ये गेल्या तीन दिवसात राज्याची विजेच्या मागणीत तब्बल दोन हजार मेगावॅटची घट झाली असून 14 हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदली जात आहे. तर मुंबईच्या मागणीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे वीज केंद्रांना विश्रांती मिळाली असून महानिर्मितीकडून आज पाच हजार दोनशे मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे, तर खासगी प्रकल्पातून 3200 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून पाच हजार 400 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे, तर मुंबईला वीज पुरवठा करणाऱया टाटा पॉवरकडून 842 मेगावॅट, अदानीकडून अडीचशे मेगावॅट एकढी वीज निर्मिती केली जात आहे.
























































