
कोल्हापुरात अज्ञात समाजकंटकांकडून टाकाळा चौक परिसरातील एका नामवंत खाजगी रुग्णालयावर रात्री उशीरा अंधाराचा फायदा घेत, दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे कोविड रुग्णांवर येथे उपचार करण्यात येऊ नये या मागणीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येऊ लागल्याने, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान दगडफेक करून पळुन जाणारा तो समाजकंटक अजुन सापडला नसला तरी अशा स्वार्थी मानसिकतेवर सर्वच स्तरातुन टिकेची झोड उठली आहे. जिल्ह्यात सध्या सर्वत्र करोना रुग्णांची वाढ होत आहे. सामुहिक संसर्ग सुरू झाल्याने,प्रशासनाने खाजगी रुग्णालयातही कोविड रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर टाकाळा चौक येथील एका नामांकित रुग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने, परिसरातील काही नागरिकांकडून दुपारी विरोध करण्याचा प्रयत्न झाला. तर रात्री थेट दगडफेकच करण्यात आल्याने, संबंधित रुग्णालयासह परिसरातही भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिसांना माहिती देऊन, त्या समाजकंटकांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
























































