हिंदुस्थानची प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. मात्र जगातील अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा मृत्युदर सतत घटतोय ही मोठी दिलासादायक बाब असल्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. देशातील 5 राज्यांत कोरोना मृत्युदर शून्य असून 14 राज्यांत तो 1 टक्क्याहून कमी आहे. देशातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालये सरकारी सहकार्याने करीत असलेल्या स्तुत्य कामगिरीमुळे कोरोनाच्या वाढत्या महामारीत देशाने या आजारातून बरे होणाऱया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात रोगाचा सामाजिक संसर्ग सुरु झाला असला तरी नागरिकांनीच घाबरून जाण्याचे कारण नाही असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
– राज्ये आणि केंद्र सरकारच्या स्तुत्य उपाययोजनांमुळे देशाने कोरोनाला रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. गेल्या महिन्यात देशाचा कोरोना मृत्युदर 2.82 होता तो आता 2.49 झाला आहे. राज्ये आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या प्रभावी योजनांमुळे देशातील कोरोना मृत्युदर (सीएफआर) कमी राखण्यात आपण यशस्वी ठरल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
अनेक राज्यांचा मृत्युदर एकहून कमी
केंद्र आणि राज्ये यांच्या समन्वयातून कोरोना मृत्युदर 1 पेक्षाही खाली आणण्यात यश आले आहे. मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि अंदमान -निकोबारमध्ये सीएफआर शून्यावर आला आहे. त्रिपुरा (0.19 टक्के), आसाम (0.23), केरळ (0.23), ओडिशा (0.51), गोवा (0.60), हिमाचल प्रदेश (0.75), बिहार (0.83), तेलंगणा (0.93) या राज्यांनी कोरोना मृत्युदर एकपेक्षा कमी ठेवण्याची किमया साधली आहे. दाट लोकवस्तीच्या मुंबई शहरानेही कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱया धारावीत कोरोनाला रोखण्यात महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला यश मिळाले आहे. मुंबईच्या धारावी पॅटर्नचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे.
























































